- अर्बन ॲक्सेसिबिलिटी अँड लिव्हॅबिलिटी इन द डिजिटल एज’ संकल्पनेवर UMI परिषद; केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते उद्घाटन,डिजिटल नवोपक्रमातून शहरी गतिशीलता वाढवणारे महामेट्रोचे तंत्रज्ञान ठरले केंद्रबिंदू,महामेट्रोच्या ई-स्कूटरची मान्यवरांनी प्रत्यक्ष चालवून केली पाहणी
भुवनेश्वर: १९ व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ (UMI) परिषदेचे उद्घाटन आज भुवनेश्वर (ओडिशा) येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री. तोखन साहू यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या परिषदेचे आयोजन ‘अर्बन ॲक्सेसिबिलिटी अँड लिव्हॅबिलिटी इन द डिजिटल एज’ (Urban Accessibility and Livability in the Digital Age) या मुख्य संकल्पनेवर करण्यात आले आहे.
या उद्घाटन समारंभाला ओडिशाचे गृहनिर्माण, नगरविकास व सार्वजनिक धोरणे मंत्री डॉ. कृष्ण चंद्र महापात्र, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्री. सत्येंद्र सिंह, ओडिशा सरकारच्या मुख्य सचिव श्रीमती अनु गर्ग तसेच गृहनिर्माण व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती उषा पाढी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिजिटल नवोपक्रमातून शहरी गतिशीलता; महामेट्रोच्या स्टॉलला मान्यवरांची भेट:
परिषदेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्री. तोखन साहू आणि ओडिशाचे नगरविकास मंत्री डॉ. कृष्ण चंद्र महापात्र यांनी महामेट्रोच्या स्टॉला भेट देऊन उद्घाटन केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले व स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
या प्रदर्शनात महामेट्रोने डिजिटल इनोव्हेशनच्या माध्यमातून शहरी सुलभता आणि गतिशीलता वाढवण्यासाठी राबवलेल्या अत्याधुनिक प्रणालींचे प्रभावी सादरीकरण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
१. डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट डॅशबोर्ड (Digital Project Management Dashboard): प्रकल्पांच्या जलद व पारदर्शक अंमलबजावणीसाठीचे रिअल-टाइम नियंत्रण.
२. संचालन व देखभाल डिजिटल रूपांतरण (O&M Digital Transformation): मेट्रोच्या दैनंदिन संचालन आणि देखभालीमध्ये आधुनिक डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर.
३. डिजिटल आय आणि मास्टरमाइंड (Digital Eye & Mastermind): सुरक्षेसाठी तसेच अचूक संनियंत्रणासाठी प्रगत तंत्रज्ञानाची जोड.
४. सीमलेस ‘वन ॲप’ जर्नी (Seamless ‘One App’ Journey): प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून संपूर्ण प्रवासाचा एकात्मिक व सुलभ डिजिटल अनुभव.
५. स्मार्ट आणि कनेक्टेड मोबिलिटी (Smart & Connected Mobility): शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या (Last-Mile) वाहतुकीसाठी एकात्मिक कनेक्टिव्हिटी.
६. सोशल मीडिया एंगेजमेंट (Social Media Engagement): प्रवाशांशी थेट संवाद आणि माहितीच्या तत्पर देवाणघेवाणीसाठी प्रभावी डिजिटल माध्यम.
या स्टॉलवर विशेष आकर्षण ठरलेल्या ‘ई-स्कूट’ची (e-scoot) श्री. तोखन साहू आणि डॉ. कृष्ण चंद्र महापात्र यांनी प्रत्यक्ष चालवून पाहणी केली; तसेच महामेट्रोच्या या पर्यावरणपूरक, शाश्वत व डिजिटल उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. ‘फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
देशात २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा, दररोज १.२५ कोटी प्रवासी लाभान्वित – तोखन साहू:
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री श्री. तोखन साहू यांनी देशातील मेट्रो प्रवासाच्या वेगाने होणाऱ्या विस्ताराचा आढावा मांडला. “भारतातील २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा यशस्वीपणे कार्यरत असून, देशभरात दररोज तब्बल १.२५ कोटींहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. डिजिटल वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी वाहतूक अधिक वेगवान व सुलभ होत असून नागरिकांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
५२ टक्के नागरिक दुचाकी वाहनांचा करतात वापर – सचिव सत्येंद्र सिंह: केंद्रीय सचिव श्री. सत्येंद्र सिंह यांनी वाहतूक व्यवस्थेवरील महत्त्वाच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत आपले विचार मांडले. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत देशातील शहरी आणि ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्थेवर एक सखोल सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, देशभरात एकूण प्रवास करणाऱ्यांपैकी ५२ टक्के नागरिक हे दुचाकीचा (Two-Wheeler) वापर करतात. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या या सर्व घटकांसाठी अधिक सुरक्षित, सोयीस्कर, आधुनिक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.