Connect with us

Marathi

अग्निशमन सेवा अधिक सक्षम करणार : महापौर

Published

on

मनपा मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस साजरा,शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार

नागपूर : शहराचा होणारा विस्तार आणि नागरिकांच्या वाढत्या गरजेनुसार शहराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अग्निशमन सेवा अधिक सक्षम करणार असे प्रतिपादन मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता.14) अग्निशमन सेवा दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, एआयएमआयएमचे गट नेते श्री शकील पटेल, श्री. अभिजीत झा, श्री. विनोद कन्हेरे, नगरसेविकास श्रीमती माधुरी टेकाम, श्रीमती योगिता तेलंग, श्री. सिरजुदीन अन्सारी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. मंगेश खवले, श्री. निर्भय जैन, श्री. अशोक गराटे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते उपस्थित होते.

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अग्निशमन सेवा दिवसानिमित्त सर्वप्रथम जनतेच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन केले. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळया ठिकाणी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करले या घटनेतील अग्निशमन योद्धांच्या कार्याला त्यांनी मनपाच्या वतीने सलाम आणि जवनांच्या स्मृतीला वंदन केले. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे २२ अग्शिनमन केंद्रांचा मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. शिवाय अग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याकरिता मनुष्यबळाची भरती करून विभागाला बळकट करण्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी महापौर श्रीमती निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यापर्ण करीत अभिवादन केले. त्यानंतर शहीद अग्निशमन जवानांना स्मृती चिन्हाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. पुढे त्यांनी अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले.

यावेळी कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातर्फे अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. भगवान वाघ, लकडगंज अग्निशमन केंद्रातर्फे श्री. दिलीप चव्हाण, त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्रातर्फे सुरेश आत्राम यांनी परेड पथ संचलन करीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांना मानवंदना दिली.

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आपत्कालीन घटनांवर नियंत्रण आणण्याचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या औचित्य साधून मनपाच्या अग्निशमन विभागाने तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. यात राष्ट्रीय तसेच शहरातील शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेण्यात आली.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

यावेळी टॅक्टिकल मिडले ड्रिल, टीटीएल ड्रिल, ऑइल फायर ड्रील, व्हेरीयर ब्रँचेस व जेट डेमोस्टेशन ड्रिल आणि 32 मीटरच्या हायड्रोलिक प्लॅटफार्म ड्रिल आयोजित करण्यात आले. बँड पथकाचे नियोजन श्री. प्रकाश कलसीया यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व आभार अग्निशमन विभागाचे उपायुक्त श्री. अशोक गराटे यांनी मानले.

शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त

अग्निशमन दलात कर्तव्य बजावताना हुतात्मा पत्करणाऱ्या शहीद जवान गुलाबरावजी कावळे, प्रभु कुहीकर, आणि शहीद रमेश ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनाचा मनपाचा मनाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह व तुळशी रोपटे देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शहीद गुलाबरावजी कावळे यांचे सुपुत्र श्री शैलेश कावळे, शहीद प्रभु कुहीकर यांच्या पत्नी श्रीमती चंद्रिका कुहीकर, आणि शहीद रमेश ठाकरे यांच्या पत्नी शांताबाई ठाकरे यांनी सन्मान स्वीकारला.

अग्निशमन जवानांचा सत्कार

शहरातील विविध भागात आलेल्या अतिवृष्टी व आपत्तीदरम्यान जिवीत हानीपासून नागरिकांना सुखरुप बाहरे काढून सुरक्षितता प्रदान केली अशा उल्लेखनीय कार्याबद्दल विभागीय अधिकारी व कर्मचारी यांना मनपाचा मानाचा दुपट्टा, प्रशस्तीपत्र, देऊन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते खालील जवांनाचा सत्कार करण्यात आला. यात अग्निशमन विभागातील खालील अधिकारी व जवानांचा समावेश आहे.

श्री. अकलीम शेख- प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी

श्री. सुरेश बिनेकर-उप अग्निशमन केंद्र अधिकारी

श्री. राजू पवार –प्रमुख अग्निशमन विमोचक

श्री. योगेश खोडके -अग्निशमन विमोचक

स्व. सुनिल समरीत यांचे पुत्र –लॉरी ड्रायव्हर

श्री. राजेश कारमोरे- सफाई कर्मचारी

श्री. सुरेश आत्राम- प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी

श्री. रविंद्र मसरकोल्हे –प्र. उप अग्निशमन केंद्र अधिकारी

श्री. दिनेश देवकते – कंत्राटी अग्निशमन विमोचक

श्री. गौरव शंकर कांबळे- कंत्राटी अग्निशमन विमोचक

श्री.बबन जाधव- चालक यंत्र चालक

श्री. निलेश देठे- कंत्राटी अग्निशमन विमोचक

श्री. सौरभ चौधरी – (आरोग्य विभाग)

श्री अजय ठवकर – कंत्राटी अग्निशमन विमोचक

श्री. रिंकु कुहीकर- कंत्राटी अग्निशमन विमोचक

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi

भुवनेश्वर येथे १९ व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषदेचे शानदार उद्घाटन; महामेट्रोच्या स्टॉलचे विशेष आकर्षण

Published

on

  • अर्बन ॲक्सेसिबिलिटी अँड लिव्हॅबिलिटी इन द डिजिटल एज’ संकल्पनेवर UMI परिषद; केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते उद्घाटन,डिजिटल नवोपक्रमातून शहरी गतिशीलता वाढवणारे महामेट्रोचे तंत्रज्ञान ठरले केंद्रबिंदू,महामेट्रोच्या ई-स्कूटरची मान्यवरांनी प्रत्यक्ष चालवून केली पाहणी

भुवनेश्वर: १९ व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ (UMI) परिषदेचे उद्घाटन आज भुवनेश्वर (ओडिशा) येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री. तोखन साहू यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या परिषदेचे आयोजन ‘अर्बन ॲक्सेसिबिलिटी अँड लिव्हॅबिलिटी इन द डिजिटल एज’ (Urban Accessibility and Livability in the Digital Age) या मुख्य संकल्पनेवर करण्यात आले आहे.
​या उद्घाटन समारंभाला ओडिशाचे गृहनिर्माण, नगरविकास व सार्वजनिक धोरणे मंत्री डॉ. कृष्ण चंद्र महापात्र, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्री. सत्येंद्र सिंह, ओडिशा सरकारच्या मुख्य सचिव श्रीमती अनु गर्ग तसेच गृहनिर्माण व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती उषा पाढी यांची प्रमुख उपस्थिती होती.

​डिजिटल नवोपक्रमातून शहरी गतिशीलता; महामेट्रोच्या स्टॉलला मान्यवरांची भेट:
परिषदेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्री. तोखन साहू आणि ओडिशाचे नगरविकास मंत्री डॉ. कृष्ण चंद्र महापात्र यांनी महामेट्रोच्या स्टॉला भेट देऊन उद्घाटन केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले व स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

​या प्रदर्शनात महामेट्रोने डिजिटल इनोव्हेशनच्या माध्यमातून शहरी सुलभता आणि गतिशीलता वाढवण्यासाठी राबवलेल्या अत्याधुनिक प्रणालींचे प्रभावी सादरीकरण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:

१. ​डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट डॅशबोर्ड (Digital Project Management Dashboard): प्रकल्पांच्या जलद व पारदर्शक अंमलबजावणीसाठीचे रिअल-टाइम नियंत्रण.

२. ​संचालन व देखभाल डिजिटल रूपांतरण (O&M Digital Transformation): मेट्रोच्या दैनंदिन संचालन आणि देखभालीमध्ये आधुनिक डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर.

३. ​डिजिटल आय आणि मास्टरमाइंड (Digital Eye & Mastermind): सुरक्षेसाठी तसेच अचूक संनियंत्रणासाठी प्रगत तंत्रज्ञानाची जोड.

४. ​सीमलेस ‘वन ॲप’ जर्नी (Seamless ‘One App’ Journey): प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून संपूर्ण प्रवासाचा एकात्मिक व सुलभ डिजिटल अनुभव.

५. ​स्मार्ट आणि कनेक्टेड मोबिलिटी (Smart & Connected Mobility): शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या (Last-Mile) वाहतुकीसाठी एकात्मिक कनेक्टिव्हिटी.

६. ​सोशल मीडिया एंगेजमेंट (Social Media Engagement): प्रवाशांशी थेट संवाद आणि माहितीच्या तत्पर देवाणघेवाणीसाठी प्रभावी डिजिटल माध्यम.

​​या स्टॉलवर विशेष आकर्षण ठरलेल्या ‘ई-स्कूट’ची (e-scoot) श्री. तोखन साहू आणि डॉ. कृष्ण चंद्र महापात्र यांनी प्रत्यक्ष चालवून पाहणी केली; तसेच महामेट्रोच्या या पर्यावरणपूरक, शाश्वत व डिजिटल उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. ‘फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

​देशात २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा, दररोज १.२५ कोटी प्रवासी लाभान्वित – तोखन साहू:
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री श्री. तोखन साहू यांनी देशातील मेट्रो प्रवासाच्या वेगाने होणाऱ्या विस्ताराचा आढावा मांडला. “भारतातील २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा यशस्वीपणे कार्यरत असून, देशभरात दररोज तब्बल १.२५ कोटींहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. डिजिटल वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी वाहतूक अधिक वेगवान व सुलभ होत असून नागरिकांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

​५२ टक्के नागरिक दुचाकी वाहनांचा करतात वापर – सचिव सत्येंद्र सिंह: केंद्रीय सचिव श्री. सत्येंद्र सिंह यांनी वाहतूक व्यवस्थेवरील महत्त्वाच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत आपले विचार मांडले. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत देशातील शहरी आणि ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्थेवर एक सखोल सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, देशभरात एकूण प्रवास करणाऱ्यांपैकी ५२ टक्के नागरिक हे दुचाकीचा (Two-Wheeler) वापर करतात. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या या सर्व घटकांसाठी अधिक सुरक्षित, सोयीस्कर, आधुनिक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Continue Reading

Marathi

जपानच्या विद्यापीठात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा

Published

on

  • जपानच्या भदंत युक्यो यांचे दीक्षाभूमीवर गौरवोद्गार – कोयासान विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिली जाते बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची ओळख – आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत भारत-जपानच्या भिक्खूंचे विचारमंथन

नागपूरः भारतात डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी घडविलेल्या धम्मक्रांतीचा जागर आता जपानच्या विद्यापीठातही होत आहे. जपानच्या कोयासान विद्यापीठाच्या प्रांगणात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा असून, तेथे येणार्‍या विद्यार्थ्यांना या महामानवाने भारतात बुद्ध धम्माचे चक्र पुन्हा कसे गतिमान केले, याची ओळख आवर्जून करून दिली जाते. ‘भारतात आज बुद्ध धम्माचे जे अस्तित्व आणि व्यापक स्वरूप दिसते, त्यामागे डॉ. आंबेडकरांचे अतुलनीय योगदान आहे, अशा शब्दांत जपानचे भदंत युक्यो यांनी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला दीक्षाभूमीवर आयोजित
आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत भदंत युक्यो बोलत होते. अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. साएकी युकाई, नागासाकी, तामिळनाडूचे भंते बोधी धम्म, चेन्नईचे राहुल आनंद, डोंगरगढचे भंते कुमार कश्यप आणि अ‍ॅड. किशोर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘भदंत ससाई यांच्यामुळे आम्हाला डॉ. आंबेडकर समजले,’ असे सांगत भदंत युक्यो म्हणाले, भारतात आल्यानंतर बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांच्या विचारांची व्यापकता जवळून जाणून घेता आली. आम्ही त्यांच्या विचारांचा स्वीकार केला आहे. आता कोयासान विद्यापीठात धम्माच्या अध्ययनासोबत बाबासाहेबांच्या विचारांची बीजेही विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहेत. विद्यापीठात अन्य
विषयांबरोबर बौद्ध धर्माचेही शिक्षण दिले जाते.
परिषदेत भदंत ससाई यांनी बुद्ध धम्माच्या वाटचालीवर मार्गदर्शन केले. विविध देश आणि राज्यांतून आलेल्या मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांचा मानवतावादी संदेश, धम्माचे विविध पैलू आणि आजच्या अस्थिर जगात त्याची वाढती प्रासंगिकता सांगितली. जपानी भाषेतील भाषणाचा हिंदी आणि मराठीत अनुवाद आंबेडकरी विचारवंत तथा बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. एस. के. गजभिये यांनी केला. संचालनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

Continue Reading

Business

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात 50 मेगावॅटची स्थापित क्षमता यशस्वीरीत्या साध्य

Published

on

नागपूर,18 ऑक्टोबर 2026: महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला शाश्वत आणि आत्मनिर्भर ऊर्जेची जोड देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या अतिशय महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ (MSKVY २.०) अंतर्गत नागपूर जिल्ह्याने 50 मेगावॅटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात 50 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या प्रस्थापित करून महावितरण आणि स्थानिक प्रशासनाने ग्रामीण भागात ऊर्जा क्रांतीची नवी पहाट आणली आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 16 हजार शेतकऱ्यांना आता रात्रीच्या अंधारात किंवा बिकट परिस्थितीत सिंचन करण्याची गरज उरणार नसून, त्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून शेतीसाठी रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना वन्यजीवांचा धोका, साप-विंचवांची भीती आणि रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या या विशेष उपक्रमामुळे ही अडचण कायमची दूर होण्याच्या दिशेने नागपूर जिल्ह्याने भक्कम पाऊल उचलले आहे. महावितरणच्या उपकेंद्रांनजीक विकेंद्रित स्वरूपात उभारण्यात आलेल्या या 10 सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे 50 मेगावॅटची हरित ऊर्जा थेट कृषी वाहिन्यांमध्ये जोडली जात आहे. यामुळे वीज वहनादरम्यान होणारा अपव्यय टाळता येत असून स्थानिक पातळीवरच गुणवत्तेचा वीजपुरवठा करणे शक्य झाले आहे.

या योजनेची अंमलबजावणी केवळ विजेपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरत आहे. सौर प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना या माध्यमातून प्रतिहेक्टरी आकर्षक वार्षिक भाडेतत्त्वाचा निश्चित मोबदला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना एक हक्काचा, सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. 50 मेगावॅटची ही प्रस्थापित क्षमता साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याचे मुख्य अभियंता राजेश नाईक व नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर जिल्हा प्रशासन, , सौर ऊर्जा विकासक आणि स्थानिक शेतकऱ्यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे. पारंपरिक औष्णिक विजेवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त सौर विजेचा वापर वाढल्याने हजारो टन कार्बनचे उत्सर्जन रोखण्यास मदत होणार आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ ही केवळ वीज निर्मितीची योजना नसून, ती बळीराजाच्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी आणणारी एक सामाजिक-आर्थिक क्रांती ठरत आहे. नागपूर जिल्ह्यातील येनवा, कचारीसावंगा, भारसिंगी, सावरगाव, कळमेशवर, कुही, रामटेक, चिकलापार, उमरेड आणि वडवहिरा येथील 33/11 केव्ही उपकेंद्रावर उभारण्यात आलेल्या या अकूण 50 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे हे यश नागपूर जिल्ह्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणारे असून, यामुळे सुमारे 16 हजार शेतक-यांना सींचनासाथी दिवसा वीज उपलब्ध झाली अहे. आगामी काळात 100 टक्के कृषी वाहिन्यांचे सौरीकरण करण्याच्या महावितरणच्या ध्येयाला यामुळे मोठी गती मिळाली आहे.

Continue Reading
Advertisement

Nagpur, IN
10:24 am, 24 Oct 2026
weather icon 30.2 °C
Clear Sky
Wind Gust 6 Km/h

Trending