नागपूरच्या दीक्षाभूमी चा विकास, विस्तारीकरण व सौंदर्यकरण करण्यासाठी उत्तर दिशेची कॉटन रिसर्च सेंटर ची 5 एकर जागा व पूर्व दिशेची आरोग्य विभागाची 11 एकर जागा मिळावी व या दोन्ही प्रवेश द्वारावर सुरू असलेली बांधकामे थांबवावी या प्रमुख मागणीसाठी बसपाने आज नागपूरच्या संविधान चौकात बसपा चे प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात भव्य धरणे निदर्शने केली.
निदर्शकांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून निवेदने पाठवण्यात आली.
धरणे निदर्शने कार्यक्रमात दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ पुरण मेश्राम, रिपब्लिकन नेते विनायक जामगडे, समता सैनिक दलाचे प्रदीप मुन, सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी खैरकर, विद्यार्थी नेते आशिष फुलझेले, बसपा चे प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, नागोराव जयकर, प्रदेश सचिव प्रफुल मानके, विवेक हाडके, रंजनाताई ढोरे, राजकुमार बोरकर, जिल्हाध्यक्ष योगीराज लांजेवार, संजय थुल, सुशील वासनिक, बौद्ध प्रचार समितीचे डॉक्टर भिलावे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी तर समारोप नागपूर महानगराचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केला.
स्मारक समितीकडे उपलब्ध असलेली जमीन कमी पडत असल्याने 22 ऑक्टोबर 2015 रोजी हल्लीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासात जागा व पैसा कमी पडू देणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2015 रोजी रामगिरीवर त्याबाबत बैठकही घेतली. 27 मार्च 2018 रोजी मंत्रालयात उच्च अधिकार समितीची बैठक घेतली व दीक्षाभूमीच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली. त्यातील अंडरग्राउंड पार्किंग वगळून इतर बाबी विनाविलंब अमलात आणाव्या अशी बसपाची मुख्य मागणी आहे. यासाठी बसपाने अनेक निवेदने दिलेली आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी या महिन्यात निर्णय घेतला नाही तर हा विषय राज्यभर चर्चेत आणून विधान भवनाला घेराव घातल्या जाईल अशी घोषणा यावेळी प्रदेशाध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांनी केली.
कार्यक्रमाला महिला नेत्या शबाना खान, कविता लांडगे, मंगेश नागदेवे, चंद्रशेखर कांबळे, सौरभ जामगडे, संजय जयस्वाल, विजयकुमार डहाट, अजय पात्रे, धम्मपाल आवडे, अंकित थूल, सहदेव पिल्लेवान, सुरेंद्र डोंगरे, मनोज निकाळजे, अजय उके, नितीन वंजारी, उमेश मेश्राम, नरेश गायकवाड, सुरेश मानवटकर, अरविंद मेश्राम, शेंडे गुरुजी, पूनेश्वर मोटघरे, रूपराव नारनवरे, वीरेंद्र कापसे, अरुण शेवडे, बालचंद्र जगताप, सत्यवान मेश्राम, सुमित जांभुळकर, अशोक रंगारी, सुनील सरदार, जनार्दन मेंढे, हेमंत बोरकर, मंगेश पगारे, शशिकांत मेश्राम आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित झाले होते.
कोराडी : महादुला येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहणारे अमित शास्त्रकार यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. गॅसचा अचानकच भडका उडाल्याने घरातील काचा फुटल्या. घरगुती साहित्य अस्तव्यस्त झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस विभाग व गॅस पुरवठा एजन्सीला माहिती देण्यात आली. गॅस पुरवठा एजन्सी चे सर्व तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विभागाची चमुही घटनास्थळी दाखल झाली. गॅस शेगडी चा नॉब चुकून सुरू राहिल्याने व घरातील दिवा जाळण्याचा पेटवल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं आग लवकर आटोक्यात आली. याच घरी तीन गॅस सिलेंडर भरलेले होते. कदाचित आग पसरली असती तर फार मोठी हानी झाली असती.
किल्ले कोलार टर्निंगजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर वाहन निघून गेल्याची माहिती
खापरखेडा :
खापरखेडा येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये राहणारे रवींद्र मनोहर वालोकर यांचा नागपूर–मध्य प्रदेश महामार्गावर दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र वालोकर यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच अपघाताची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
टर्निंगजवळ नेमके काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र वालोकर हे आपल्या होंडा दुचाकीने दहेगावच्या दिशेने प्रवास करत होते. ते दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ आले असताना हा अपघात घडला. यावेळी समोरून चुकीच्या बाजूने बस येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, मागून आलेल्या ट्रकची रवींद्र यांच्या दुचाकीला धडक बसली.
धडक बसल्यानंतर रवींद्र हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अपघाताचा आवाज ऐकून काही नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, नागरिक घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित बस आणि ट्रक तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, बसच्या चुकीच्या बाजूने येण्याचा या घटनेशी काय संबंध होता आणि ट्रकचालकाची भूमिका काय होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या घटनेची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची परिस्थिती पाहून पुढील कार्यवाही करण्यात आली. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांची मदत घेण्यात आली.
घटनास्थळी मिळालेल्या भारत सरकारच्या युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्डच्या आधारे रवींद्र वालोकर यांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे समजते.
हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य गोलू हे जावेद नर्सिंग होमकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी नागपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर रवींद्र वालोकर यांच्या निधनाची बातमी खापरखेडा परिसरात समजताच शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात असून, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वालोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रवींद्र यांचे वडील मनोहर वालोकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते. त्यांचेही यापूर्वी निधन झाले आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मल्हार नावाचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखद परिस्थिती ओढवली आहे.
नागपूर, दि. २४ : न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी करण्यासाठी मध्यस्थी ही महत्त्वाची प्रक्रिया असून, तिच्या प्रभावी अंमलबजावणीत जिल्हा न्यायव्यवस्थेची भूमिका निर्णायक आहे. न्यायालयांमधील प्रलंबित वादांचे मध्यस्थीच्या माध्यमातून निराकरण करण्यासाठी न्यायाधीशांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी देखरेख समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी देखरेख उपसमिती, नागपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात विभागीय मध्यस्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर मध्यस्थी देखरेख उपसमितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एस. किलोर, सदस्य न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, मुंबई उच्च न्यायालयाचे मध्यस्थी देखरेख समितीचे संचालक तथा समन्वयक टी. एस. अकाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यावर आधारित गीताने परिषदेची सुरुवात झाली. मान्यवरांनी रोपट्यांना पाणी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
मध्यस्थी प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन
उद्घाटनपर भाषणात न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी भारतातील मध्यस्थी प्रक्रियेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. वादांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी उपलब्ध निधीचा पुरेपूर उपयोग करून वार्षिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मध्यस्थी प्रक्रियेद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मेडिएशन अँड कॉन्सिलिएशन प्रोजेक्ट कमिटीने सुरू केलेल्या ‘मेडिएशन फॉर द नेशन 3.0’ या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. बदलत्या परिस्थितीत मध्यस्थीच्या माध्यमातून वादांचे निराकरण करण्याची गरज वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. कौटुंबिक वादांसह विविध प्रकरणांत मध्यस्थी परिषदेत तज्ज्ञांनी मध्यस्थीचे सध्याचे स्वरूप, भविष्यातील दिशा, कौटुंबिक वादांमधील मध्यस्थी, समुपदेशनाची भूमिका आणि मध्यस्थीकडे प्रकरणे सोपविणाऱ्या न्यायाधीशांची जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन केले.
न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, न्यायमूर्ती यू. एस. जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती नंदेश एस. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. मध्यस्थीमुळे संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याची, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची आणि परस्पर संवादातून वाद सोडविण्याची संधी मिळते. त्यामुळे अनावश्यक संघर्ष कमी होऊन परस्पर संबंध टिकविण्यास मदत होते. मध्यस्थीची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी योग्य प्रकरणांची निवड, कुशल व निष्पक्ष मध्यस्थ, योग्य समुपदेशन आणि पक्षकारांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीशांसाठी संवादकौशल्य, पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेणे आणि प्रकरणांचे योग्य मूल्यमापन याबाबत सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन मध्यस्थी शक्य झाल्याने दुर्गम भागातील पक्षकारांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मध्यस्थी ही कायदेशीर प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग
समारोप सत्रात न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी मध्यस्थी ही न्यायव्यवस्थेच्या चौकटीबाहेरील प्रक्रिया नसून, कायद्याच्या आधारे वाद सोडविण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. मध्यस्थीच्या माध्यमातून पक्षकारांना वादाच्या निराकरणात अर्थपूर्ण सहभाग घेता येतो. योग्य पद्धतीने राबविलेल्या मध्यस्थीमुळे संवाद सुधारतो, संघर्ष कमी होतो आणि शक्य असेल तेथे परस्पर संबंध टिकवून ठेवता येतात, असे त्यांनी नमूद केले.
वादाचे स्वरूप, संबंधित पक्षांची परिस्थिती आणि मध्यस्थीच्या माध्यमातून न्याय्य व उपयुक्त तोडगा निघण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रकरणे मध्यस्थीकडे पाठविण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालये, विधी सेवा संस्था, वकील संघटना आणि मध्यस्थी केंद्रांमधील समन्वय प्रभावी मध्यस्थीसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सलमान आझमी यांनी केले. नागपूर येथील लघुवाद न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एन. एन. बेदरकर आणि १७ व्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एल. एच. पटेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राधिकरणाचे अधिकारी, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे प्रबंधक बी.पी. क्षीरसागर, उच्च न्यायालय विधी सेवा उप समितीचे सचिव सुनील हाके, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण उन्हाळे व जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी यांनी परिश्रम घेतले.