नागपूर,24 जुलै 2026: शाश्वत ऊर्जा आणि ग्रामीण विकासाचा सुवर्णसंगम साधत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील पिपरी गावाने एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’, राज्य सरकारच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना’, बुटीबोरी येथील ‘कॅल्डरीज सोशल वेलफेअर ट्रस्ट’ आणि ‘प्रतीक सामाजिक बहुद्देशीय संस्था’ यांच्या संयुक्त आणि प्रभावी सहकार्यातून पिपरी गावाने नागपूर जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा बहुमान पटकावला आहे. या क्रांतीकारी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना थेट सौर ऊर्जेवर आणून स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
या ‘सौरग्राम’ प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज, गुरुवार, 23 जुलै रोजी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी (भाप्रसे), महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, ‘एस.डब्ल्यू.ए. कॅल्डरीज’चे संचालक सत्येन्द्र कुमार, नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे, मुंबई सांघिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता स्वप्निल गोतमारे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन) संजय श्रुंगारे, कॅल्डरीज रिफॅक्ट्रीज लि. चे मुख्य व्यवस्थापक सुबोध दुबे, गांधी खापरी गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सरिता करनाके, प्रतीक सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे प्रतीक उमरे आणि रि ऑटोमेशनचे संचालक प्रदीप उमरे उपस्थित होते. यांच्यासह बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आणि पिपरी गावातील आबालवृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
महावितरणच्या बुटीबोरी विभागांतर्गत येणाऱ्या आणि टाकळघाट शाखा कार्यालयाद्वारे सेवा पुरविल्या जाणाऱ्या पिपरी गावातील सर्व 30 रहिवासी कुटुंबे, गावातील सार्वजनिक पथदिवे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा एकूण 32 ग्राहकांच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. यातील 30 घरगुती ग्राहकांपैकी 23 ग्राहकांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’चा तर 8 ग्राहकांनी ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजने’चा लाभ घेत आपल्या घरांच्या छतांवर रूफटॉप सोलर पॅनलची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकल्पांमधून आता प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मितीला सुरुवात झाली असून गावाची वीज गरज आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली जात आहे. या संपूर्ण सौर प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता 39 किलोवॅट इतकी आहे.
पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण कमी करून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. या नाविन्यपूर्ण आणि दूरगामी उपक्रमामुळे पिपरी गावाने केवळ स्वतःचे ऊर्जा स्वावलंबन साधले नाही, तर भविष्यातील ग्रामविकासाचा एक नवा व आदर्श पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर निर्माण केला आहे.
पिपरी गावाला 100 टक्के सौर ऊर्जित करण्यासाठी आणि या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रत्यक्षातउतरविण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत चरपे, सहायक अभियंता स्वप्निल सोनटक्के आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले. प्रशासकीय समन्वय आणि जनसहभागाचा उत्तम मेळ घालून हा प्रकल्प अल्पावधीत पूर्ण करण्यात आला. या शानदार उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अरविंद नारायणे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रशांत चरपे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज पुरी यांनी केले.
कोराडी : महादुला येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहणारे अमित शास्त्रकार यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. गॅसचा अचानकच भडका उडाल्याने घरातील काचा फुटल्या. घरगुती साहित्य अस्तव्यस्त झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस विभाग व गॅस पुरवठा एजन्सीला माहिती देण्यात आली. गॅस पुरवठा एजन्सी चे सर्व तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विभागाची चमुही घटनास्थळी दाखल झाली. गॅस शेगडी चा नॉब चुकून सुरू राहिल्याने व घरातील दिवा जाळण्याचा पेटवल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं आग लवकर आटोक्यात आली. याच घरी तीन गॅस सिलेंडर भरलेले होते. कदाचित आग पसरली असती तर फार मोठी हानी झाली असती.
किल्ले कोलार टर्निंगजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर वाहन निघून गेल्याची माहिती
खापरखेडा :
खापरखेडा येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये राहणारे रवींद्र मनोहर वालोकर यांचा नागपूर–मध्य प्रदेश महामार्गावर दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र वालोकर यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच अपघाताची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
टर्निंगजवळ नेमके काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र वालोकर हे आपल्या होंडा दुचाकीने दहेगावच्या दिशेने प्रवास करत होते. ते दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ आले असताना हा अपघात घडला. यावेळी समोरून चुकीच्या बाजूने बस येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, मागून आलेल्या ट्रकची रवींद्र यांच्या दुचाकीला धडक बसली.
धडक बसल्यानंतर रवींद्र हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अपघाताचा आवाज ऐकून काही नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, नागरिक घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित बस आणि ट्रक तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, बसच्या चुकीच्या बाजूने येण्याचा या घटनेशी काय संबंध होता आणि ट्रकचालकाची भूमिका काय होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या घटनेची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची परिस्थिती पाहून पुढील कार्यवाही करण्यात आली. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांची मदत घेण्यात आली.
घटनास्थळी मिळालेल्या भारत सरकारच्या युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्डच्या आधारे रवींद्र वालोकर यांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे समजते.
हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य गोलू हे जावेद नर्सिंग होमकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी नागपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर रवींद्र वालोकर यांच्या निधनाची बातमी खापरखेडा परिसरात समजताच शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात असून, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वालोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रवींद्र यांचे वडील मनोहर वालोकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते. त्यांचेही यापूर्वी निधन झाले आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मल्हार नावाचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखद परिस्थिती ओढवली आहे.
नागपूर, दि. २४ : न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी करण्यासाठी मध्यस्थी ही महत्त्वाची प्रक्रिया असून, तिच्या प्रभावी अंमलबजावणीत जिल्हा न्यायव्यवस्थेची भूमिका निर्णायक आहे. न्यायालयांमधील प्रलंबित वादांचे मध्यस्थीच्या माध्यमातून निराकरण करण्यासाठी न्यायाधीशांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी देखरेख समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी देखरेख उपसमिती, नागपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात विभागीय मध्यस्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर मध्यस्थी देखरेख उपसमितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एस. किलोर, सदस्य न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, मुंबई उच्च न्यायालयाचे मध्यस्थी देखरेख समितीचे संचालक तथा समन्वयक टी. एस. अकाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यावर आधारित गीताने परिषदेची सुरुवात झाली. मान्यवरांनी रोपट्यांना पाणी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
मध्यस्थी प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन
उद्घाटनपर भाषणात न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी भारतातील मध्यस्थी प्रक्रियेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. वादांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांनी उपलब्ध निधीचा पुरेपूर उपयोग करून वार्षिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मध्यस्थी प्रक्रियेद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मेडिएशन अँड कॉन्सिलिएशन प्रोजेक्ट कमिटीने सुरू केलेल्या ‘मेडिएशन फॉर द नेशन 3.0’ या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. बदलत्या परिस्थितीत मध्यस्थीच्या माध्यमातून वादांचे निराकरण करण्याची गरज वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. कौटुंबिक वादांसह विविध प्रकरणांत मध्यस्थी परिषदेत तज्ज्ञांनी मध्यस्थीचे सध्याचे स्वरूप, भविष्यातील दिशा, कौटुंबिक वादांमधील मध्यस्थी, समुपदेशनाची भूमिका आणि मध्यस्थीकडे प्रकरणे सोपविणाऱ्या न्यायाधीशांची जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन केले.
न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, न्यायमूर्ती यू. एस. जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती नंदेश एस. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. मध्यस्थीमुळे संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याची, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची आणि परस्पर संवादातून वाद सोडविण्याची संधी मिळते. त्यामुळे अनावश्यक संघर्ष कमी होऊन परस्पर संबंध टिकविण्यास मदत होते. मध्यस्थीची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी योग्य प्रकरणांची निवड, कुशल व निष्पक्ष मध्यस्थ, योग्य समुपदेशन आणि पक्षकारांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीशांसाठी संवादकौशल्य, पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेणे आणि प्रकरणांचे योग्य मूल्यमापन याबाबत सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन मध्यस्थी शक्य झाल्याने दुर्गम भागातील पक्षकारांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मध्यस्थी ही कायदेशीर प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग
समारोप सत्रात न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी मध्यस्थी ही न्यायव्यवस्थेच्या चौकटीबाहेरील प्रक्रिया नसून, कायद्याच्या आधारे वाद सोडविण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. मध्यस्थीच्या माध्यमातून पक्षकारांना वादाच्या निराकरणात अर्थपूर्ण सहभाग घेता येतो. योग्य पद्धतीने राबविलेल्या मध्यस्थीमुळे संवाद सुधारतो, संघर्ष कमी होतो आणि शक्य असेल तेथे परस्पर संबंध टिकवून ठेवता येतात, असे त्यांनी नमूद केले.
वादाचे स्वरूप, संबंधित पक्षांची परिस्थिती आणि मध्यस्थीच्या माध्यमातून न्याय्य व उपयुक्त तोडगा निघण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रकरणे मध्यस्थीकडे पाठविण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालये, विधी सेवा संस्था, वकील संघटना आणि मध्यस्थी केंद्रांमधील समन्वय प्रभावी मध्यस्थीसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सलमान आझमी यांनी केले. नागपूर येथील लघुवाद न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एन. एन. बेदरकर आणि १७ व्या सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एल. एच. पटेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राधिकरणाचे अधिकारी, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे प्रबंधक बी.पी. क्षीरसागर, उच्च न्यायालय विधी सेवा उप समितीचे सचिव सुनील हाके, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण उन्हाळे व जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी यांनी परिश्रम घेतले.